![]() |
| सांगली सिव्हीलचे उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी यांना निवेदन देताना राज्य प्रवक्ते संतोष पाटील. बाजूस पदाधिकारी व कार्यकर्ते. |
राज्य प्रवक्ते संतोष पाटील; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार; दोन महिन्यानंतरही तपास नाही
सांगली / प्रतिनिधी
येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये दोन महिन्यापूर्वी कॉपर पाईपची चोरी झाली आहे. सुरक्षा रक्षक, सीसीटिव्हीचे जाळे, पोलीस चौकी, शेकडो कर्मचारी असतानाही चोरट्याने चोरी केली आहे. या चोरीचा अद्याप छडा लागलेला नाही. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटल व्यवस्थापन, पोलीस यांच्याबाबत संशय निर्माण झाला असून महिनाभरात या चोरीचा छडा न लागल्यास मुख्यमंत्री, आरोग्यंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करणार असा इशारा राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी दिला आहे.
पाटील यांनी आज सिव्हील मध्ये जात उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी यांची भेट घेतली. कॉपर पाईप चोरी बाबत सिव्हील व्यवस्थापनाच्या कारभारावर बोट ठेवत जाब विचारला. पाटील म्हणाले, वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात चोरी होणे दुर्दैवी आहे. रुग्णालयाला महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची सुरक्षा आहे. सीसीटिव्ही आहेत. शेकडो कर्मचारी रोज कर्तव्यावर असतात. तरीही चोरट्याने डाव साधला आहे. यामध्ये काहीतरी गडबड झाल्याची चर्चा रुग्णालयाच्या आवारात सुरू आहे.
यामध्ये व्यवस्थापनातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनाचा हात नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी यांच्याशी चर्चा झाली आहे असे सांगत पाटील म्हणाले, कॉपर पाईपची बाजारभावाप्रमाणे किमान आठ ते दहा लाख रुपये इतकी किमंत आहे. रुग्णालयाच्या पाठीमागे भिंतीला भगदाड पडले आहे.यातून आत घुसत चोरट्याने चोरी केली असावी अशी शंका पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान महिनाभराच्या आत चोरीचा छडा न लागल्यास मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार करू असा इशाराही पाटील यांनी यावेळी बोलताना दिला. प्रा.नंदकुमार सुर्वे, मनोज कांबळे, एम के कोळेकर, खुदबुद्दीन मुजावर, प्रथमेश शेटे, सुलेमान पटेल, अनुराधा शेटे, प्रताप पाटील व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
