मंत्री नितेश राणे करणार उद्घाटन; हिंदू गर्जना सभेचेही आयोजन
सांगली / प्रतिनिधी
महापालिका क्षेत्रातील बारा बलुतेदार आणि किरकोळ सेवा देणाऱ्या हिंदू व्यावसायिकांच्या माहितीचे प्रदर्शन चेतना हॉल, सांगली शासकीय रुग्णालयापाठीमागे, सांगली येथे शुक्रवार १० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यांनतर मराठा सेवा संघाच्या हॉल मध्ये 'हिंदू गर्जना' सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. या सभेस समस्त हिंदू बांधव व भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन नंदकुमार बापट व श्रीरंग केळकर यांनी दिली.
ते म्हणाले, "हिंदू व्यवसाय बंधू" या संस्थेच्या माध्यमातून अनेक व्यावसायिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सुरू आहे. अनेक हिंदू व्यवसायिक, बारा बलुतेदार, किरकोळ व्यवसायिकांना यामुळे व्यवसाय विस्तारासाठी फायदा होत आहे. यासाठी संस्थेच्या वतीने दोन कार्यशाळाही घेण्यात आल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'विश्वकर्मा' योजनेस अन्य योजनांचा लाभ व्यावसायिकांना झाला पाहिजे या अनुषंगाने या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
श्री बापट व श्री केळकर म्हणाले, राज्यात असा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर हिंदू एकता आंदोलन व हिंदू व्यवसाय बंधू संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मराठा सेवा संघाच्या हॉल मध्ये दुपारी एक वाजता 'हिंदू गर्जना' सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस समस्त हिंदू बांधव, भगिनी, व्यावसायिकांनी उपस्थित राहावे.
त्याचाच पुढील टप्पा म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगत बापट व केळकर म्हणाले, १० जानेवारी रोजी चेतना हॉल मध्ये हे प्रदर्शन आहे. यानिमित्ताने इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. हिंदू संस्कृती, परंपरा आदी विषय असतील. संस्थेच्या फोन डिरेक्टरीचे प्रकाशनही यावेळी मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास ५ हजार व्यावसायिकांचे संपर्क क्रमांक व नावे आहेत.
