![]() |
| क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मिरज येथे प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस ज्योतीताई आदाटे. समोर उपस्थित महिला. |
ज्योतीताई आदाटे; कार्य पुढं नेण्याची गरज ; मिरजेत घरेलू कामगार संघटनेच्या वतीने अभिवादन
मिरज / प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याल खांदा लाऊन सावित्रीबाईने सनातन्यांविरोधात लढा दिला. महिलांसाठी पहिली शाळा सुरु केली. त्यामुळेच महिला गुलामगीरीतून मुक्त झाल्या आहेत. त्यामुळे महिलांनी सावित्रीबाईचे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती घरेलू कामगार संघटनेच्यावतीने मिरज येथील सिद्धार्थ वसाहतीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्योती आदाटे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, आपण केवळ या महामानवांना त्यांची जयंती किंवा पुण्यतिथीला आठवण करतो. त्यांची पूजा करुन सोपस्कार पार पाडतो. महामानवांचे आपण दैवतीकरण करतोय हे आपल्या लक्षात येत नाही. कारण एकदा पूजा केली की आपल्याला महामानवांचे विचार अंगिकारावे, अशी गरज वाटत नाही. महामानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार, कार्य डोक्यात घेतले पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या माऊलीने महिलांसाठी शाळा सुरू करुन महिलांचा उद्धार केला. 200 वर्षापूर्वी कर्मट सनातन्यांनी या माऊलीला अतोनात छळले. अंगावर दगड शेणाचे गोळे मारले. तरीही या माऊलीने न डगमगता महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सगळ पचविले. आपण फक्त देव धर्म, व्रतवैकल्ये, अंधश्रद्धा यातच अडकलोय. सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी आपण वडाला फेऱ्या मारतो. थोतांड असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. काल्पनिक सावित्रीची पूजा करतो.
परंतु जिने आपल्याला खऱ्याअर्थाने गुलामगिरीतून मुक्त केले, आपला उध्दार केला, तिचे कार्य आपण किती पुढे नेले याचा विचार झाला पाहिजे. हे असच राहिले, तर पुन्हा एकदा गुलामगिरीचा काळ आला तर आश्चर्य वाटायला नको. कारण पुन्हा सावित्रीबाई होणे नाही. त्यामुळे विचार करा आपल्या मुलांसमोर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा. मुलांना स्वावलंबी बनवा. मुलामुलीत भेद करू नका. शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत, त्याचा फायदा करुन घ्या. दलालांकडून आपले आर्थिक शोषण होणार नाही, याची काळजी घ्या. घरेलु कामगांरानी आपला स्वाभिमान गहाण टाकु नये. आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, यासाठी आग्रही रहावे. तसेच आपला आत्मसन्मान जपुनच काम करावे. काम मिळण्यासाठी कोणतीही तडजोड करणे उचित होणार नाही. यावेळी या संघटनेचे समन्वयक किरण कांबळे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटक प्रियांका तुपलोंडे व कार्यकर्ते पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
