तासगाव / प्रतिनिधी
तासगाव शहरातील दूध डेअरी, बेकरी, दुग्धजन्य पदार्थ विक्री तसेच उत्पादन करणाऱ्या आस्थापना, अशा विविध ठिकाणी सांगलीच्या अन्न भेसळ प्रतिबंध प्रशासन पथकाने अचानक धाडी टाकल्या असून भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांमध्ये खळबळ माजली आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने या छापेमारीबाबत गोपनीयता पाळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सांगली जिल्हा अन्नभेसळ प्रतिबंध प्रशासना कडून तासगाव शहरातील विविध बेकरी दुकाने, दुध डेअरी, दुग्ध जन्य पदार्थ बनविणाऱ्या आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या. स्टेशन रोड लगत , राजवाड्या जवळ असणाऱ्या, श्रीराम मंदिर जवळील, विटा नाका येथील तर गणपती मंदिर जवळ असणाऱ्या एका प्रसिद्ध दूध डेअरीवर पथकाने छापमारी केली. या ठिकाणच्या सर्व व्यवसायिकाचे दूध व दुग्ध जन्य पदार्थाचे नमुने पथकाने ताब्यात घेतले आहेत.
कारवाईकडे लक्ष
शहरातील अनेक ठिकाणी भेसळीचे दूध विकले जात असल्याच्या चर्च्या सुरू असताना अन्न भेसळ विभागाने शहरातील मानांकित डेअरी आणि बेकरी दुकाने याच्यावर छापे टाकून दूध व दुग्धजन्य पदार्थाचे तपासणीसाठी घेतले आहेत.त्यामुळे व्यवसायिकाचे धाबे दणाणले आहेत.अन्न भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी याची सत्यता पडताळली तर भेसळ उघडकीस येणार असल्याने ग्राहकाच्या नजरा पथकाची कारवाई काय होतंय याच्या कडे लागून राहिल्या आहेत.
पथकातील अधिकाऱ्यांनी बेकरी , दुकाने व डेअरी मध्ये असणाऱ्या म्हैस, गाईचे दूध, तूप , ताक, खवा , पनीर अन्य खाद्य पदार्थांचे नमुने घेतले. दुधातील फॅट तपासणी तसेच दुधामध्ये रासायनिक पदार्थ याची भेसळ आहे का? ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वजनामध्ये तफावत तपासली जाणार असल्याचे समजते. मात्र अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाकडून कडक कारवाईची अपेक्षा ग्राहकाच्यातून व्यक्त होत आहे. अचानक पडलेल्या धाडीमुळे दुग्ध व्यवसायिक व बेकरी पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः दुधात भेसळ करणाराचे धाबे दणाणले आहेत. अनेकाची दुग्ध व्यवसायातील भेसळ प्रगती मोठी आहे.
शहारत भेसळीचे दूध विकले जात असल्याची चर्च्या सुरू आहे. त्याबाबत ग्राहकाच्या वाढत्या तक्रारी आहेत. अचानक झालेल्या छापेमारीमुळे काही दुकानदाराच्यात व व्यवसायीकाव्यात मोठी खळबळ माजली आहे. बेकरीत विक्री केले जाणारे तळलेले पदार्थ भेसळ युक्त तेल आणि खराब तेलात बनविलेले असतात याची शहरात उघड चर्च्या होताना दिसत आहे. या छापेमारीने बेकरी व दुध डेअरी व्यवसायिक हबकले असले तरी नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या धाडी सातत्याने सुरू राहिल्यास भविष्यात ग्राहकांना निर्भेळ दूध आणि दुग्ध जन्य पदार्थ व बेकरी पदार्थ खायला मिळतील अशा भावना ग्राहकाचायतून व्यक्त होत आहेत.
