yuva MAharashtra तर काळ सोकावेल..!

तर काळ सोकावेल..!

सांगली टाईम्स
By -

 


बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खून प्रकरण गंभीर आहे. त्यांना ज्या प्रकारे हालहाल करून मारण्यात आले त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. कुठून आली असेल आरोपींच्या मध्ये इतकी हैवानियत. क्रूरपणा. पुरोगामी महाराष्ट्रात इतक्या निर्घृणपणे खुनाची घटना कधीच अशी घटना घडली नव्हती. आताच हे का, असं का घडतंय याचा राजकारण्यांनी विचार करण्याची गरज आहे. अन्यथा आज संतोष देशमुख यांचा बळी गेलाय, उद्या तुमचा, आमचा अश्या प्रकारे शेवट झाला. तर नवल वाटायला नको.
बीड तसा विकासापासून चार हात दूर असलेला जिल्हा. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख. पण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर या जिल्ह्याची माफियांचा जिल्हा अशी नव्याने ओळख निर्माण झाली आहे. सरपंच देशमुख यांचा खून केवळ बीड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा आहे. यातील संशयित आरोपी, त्यांचे विकृत कृत्य अंगावर शहारे आणणारे आहे. इतक्या निर्दयीपणे त्यांनी देशमुख यांची हत्या केली आहे. या हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. पोलीस तपास सुरू आहे. संशयित पोलीस कोठडीत आहेत. पण इतक्या निर्दयी पणे हत्या करण्याचे धाडस त्यांच्यामध्ये आले कुठून हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
महाराष्ट्राचा बिहार झालाय का? झाला असेल तर हे पाप कोणाचे? याला जबाबदार कोण? याचे उत्तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र यांनी देणे गरजेचे आहे. ही त्यांची जबाबदारी आहे. ती त्यांना टाळता येणार नाही. पण याला बघतो, त्याला सोडणार नाही या पलीकडे ते जाताना दिसत नाहीत. निश्चितच हे महाराष्ट्रासाठी घातक आहे. पोलीस तपास होईल. आरोपींना शिक्षा होईल पण वाढलेल्या विकृतीचे काय? त्याला कसा आळा घालणार याबाबत फडणवीस यांनी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावेल. तो प्रत्येकाच्या मानगुटीवर बसेल हे लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 
Tags: