आमदार गोपीचंद पडळकर; संघर्ष करा, तरच राज्यकर्ते बनाल
सांगली / प्रतिनिधी
होय मी एका ध्येयाने वेडा झालो होतो. प्रस्थापितांच्या विरोधात गेलो. संघर्ष केला म्हणून खोट्या केसेस मध्ये कारागृहात घातले. पण जितक्या केसेस माझ्यावर घातल्या कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या दहा पटीने लोकांनी हार घातले. याच जनतेच्या प्रेमावर निवडून आलो. आमदार झालो. हा सत्कार प्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्यांचा आहे, असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. दरम्यान ११ हजारांनी निवडून आलेल्या जयंतरावाना आर. आर. पाटलांचे पोरग आमदार झालं, आपलं का नाही याची चिंता सतावत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी बोलताना केला.
येथील स्टेशन चौकात सांगली जिल्हा धनगर समाजाच्यावतीने जतचे आमदार गोपीचंद पडळकर, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ व सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आ. गोपीचंद पडळकर बोलत होते. सभेला सत्कार समितीचे स्वागताध्यक्ष तात्यासाहेब गडदे, माजी आमदार दिनकर पाटील, पै. पृथ्वीराज पवार, माजी महापौर संगीता खोत, आकाराम मासाळ, डॉ. रविंद्र आरळी, बह्मानंद पडळकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदी उपस्थित होते.
आमदार पडळकर म्हणाले, सांगली जिल्हा दोन पुढारांचा जिल्हा असल्याचे बोलले जाते. पण हा जिल्हा बारा बलुतेदारांचा आहे. १९९० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील नेत्यांनी एकही मोठा प्रकल्प आणला नाही. वसंतदादांसह कृष्णा काठच्या नेत्यांनी दुष्काळी भागात कृष्णेचे पाणी येऊ दिले नाही. अडीच वर्षे जलसंपदा मंत्रीपद मिळून देखील काम केले नाही. जत तालुक्यासह दुष्काळी भागावर यांनी अन्याय केला. दुष्काळी तालुक्यांना पाणी दिले तर आमच्या कारखान्यासाठी ऊस तोडायला कोण येणार असे वसंतदादा म्हणायचे असा आरोप ही पडळकर यांनी यावेळी बोलताना केला.
पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले, आर.आर. आबांच पोरगं निवडून आल्याने जयंतराव चिंतेत आहेत. जिल्ह्यात आता १९९० ची टीम बाहेर पडत आहे. इस्लामपूरचे जयंतराव एकटेच राहिले आहेत. पण ते विधानसभेला ११ हजार मतांनी निवडून आले म्हणजे पडल्यासारखेच आहेत. स्व. आर. आर. पाटील यांचा मुलगा आमदार झाला, पण माझा मुलगा का आमदार होत नाही, त्यामुळे जयंत पाटील यांना चांगलेच टेंशन आले आहे. हातकणंगले व सांगली लोकसभा व जत विधानसभा लढण्यासाठी त्यांनी कंपनीकडून सर्वे केला, पण तिन्ही सर्वेत नापास झाले. सत्ता व पैसा यावर राजकारणात मस्ती करायचे दिवस संपले आहेत. राजकारण आता जनतेच्या हातात गेल्याचा टोला आ. गोपीचंद पडळकर यांनी आ. जयंत पाटील यांना लगाविला.
