yuva MAharashtra सांगलीचा दबदबा गायब...!

सांगलीचा दबदबा गायब...!

सांगली टाईम्स
By -



संपादकीय..!

महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात ऐकेकाळी सांगलीचा दबदबा होता. केंद्रिय आणि राज्यपातळीवर काम करणाऱ्या खमक्या नेत्यांची फौजच जिल्ह्यात होती. सहाजिकच राजकारण आणि प्रशासनावर सांगलीच्या नेत्यांची मजबूत पक्कड होती. स्वतः आर. आर. पाटील गृहमंत्री असल्याने पोलीस प्रशासनावर त्यांचा वचक होता. डॉ. पतंगराव कदम यांच्यासमोर सकाळी सात वाजताच अधिकारी हजर व्हायचे. मदन पाटील, संभाजी पवार या नेत्यांच्या डोळ्यातच दहशत होती. त्यामुळे जिल्ह्याच्या कायदा व सुव्यस्थेसह विकासाची घडी कधी मोडली नाही. पण, या नेत्यांच्या अकाली जाण्याने जिल्हा 'बॅकफूट' वर गेला आहे. खमके नेतृत्व नसल्याने जिल्ह्याची दशा आणि दिशाही बिघडली आहे.

क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. नाट्यसंस्कृतीही याच जिल्ह्याच्या मातीत वाढली. कुस्ती पंढरी, उद्योगांची भूमी, पुढाऱ्यांचा जिल्हा अशी बिरुदे जिल्ह्याच्या नावासमोर लागली. स्व. वसंतदादा पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद लाभले. वसंतदादा, राजारामबापू पाटील यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांमुळे जिल्हा सहकारामध्ये समृध्द झाला. साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध संघ, पाणीपुरवठा योजना, बाजार समित्यांमुळे सांगली जिल्ह्याच्या विकासाची पडी घट्ट बसली. या नेत्यांच्या पश्चात पतंगराव कदम, आर. आर. पाटील, जयंत पाटील, प्रतीक पाटील यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केला.

आर. आर. पाटील यांनी उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. गृहमंत्री असताना त्यांची जिल्ह्यावर करडी नजर होती. अपवाद वगळता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कधी बिपडली नाही. त्यांच्या काळातील अधिकाऱ्यांनीही जिल्ह्याचा क्राईम रेट वाढणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली होती. डॉ. पंतगराव कदम यांनीही जिल्ह्याला एक नवी ओळख निर्माण करून दिली. जिल्हा प्रशासनावर त्यांचा वचक होता. सकाळी सात वाजताच अधिकारी त्यांच्यासमोर हजर व्हायचे. जिल्ह्याचा लेखा-जोखा मांडायचे. रस्त्यापासून पाणी योजनांपर्यंतच्या प्रश्नांवर डॉ. कदम चुटकीसरशी तोडगा काढायचे. कोणत्याही प्रश्नाचे घोंगडे त्यांनी कधी ठेवले नाही.

आर. आर. पाटील, पंतगराव कदम यांच्या अकाली जाण्याने जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. पाटील, कदम यांच्या पश्चात जयंत पाटील, कदम यांचे पुत्र डॉ. विश्वजीत कदम, वसंतदादांचे नातू प्रतीक, विशाल पाटील यांना जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची नामी संधी निर्माण झाली होती. मात्र, राजकीय अपरिपक्वतेचा अभाव, प्रभावहिन संघटनकौशल्य यामुळे संधीचे सोने करण्यात या नेत्यांना अपयश आले आहे. सध्या जिल्ह्याची स्थिती पाहता खमक्या नेतृत्वाची उणीव भासू लागली आहे. एकेकाळी जिल्ह्यात तीन-तीन कॅबिनेट मंत्री होते. प्रतीक पाटील केंद्रामध्ये राज्यमंत्री होते. मदन पाटील यांना मंत्रीपद मिळाले. महामंडळावरील नेत्यांची फौजच जिल्ह्यात होती. माजी आमदार संभाजी पवार यांचे सारखे खमके विरोधी नेतृत्व होते. परंतू आता परिस्थिती बदलली आहे. विशेषतः २०१० पासून जिल्ह्याच्या राजकीय वैभवाला ओहोटी लागली आहे. कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे, आ. जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम, खा. संजय पाटील, सुधीर गाडगीळ यांच्यासारखे सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी कुचकामी ठरू लागले आहेत.

राज्यात भाजपची सत्ता आहे. गत मंत्री मंडळामध्ये  डॉ. सुरेश खाडे यांच्याकडे कामगार मंत्रिपद होते. जिल्ह्याचे पालकत्वही त्यांना देण्यात आले होते. मात्र त्यांनी मिरज विधानसभेच्या बाहेर कधी विचार केला नाही. प्रशासनावर त्यांची पक्कड नव्हती. अधिकाऱ्यांवर वचक नव्हती.  विकासकामे होत आहेत, पण जनतेचे सरंक्षण करण्यात हे नेते अपयशी ठरले आहेत. जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह विरोधी लोकप्रतिनिधी कुचकामी ठरले आहेत. केवळ पक्षाचा आदेश आला की, तासभर आंदोलनाची नौटंकी करायची आणि फोटो काढला की, घर गाठायचे, असा एककलमी कार्यक्रम विरोचकांचा सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाट लागली आहे. प्रमुख लोकप्रतिनिधींना आपल्या नेतृत्वाची छाप पाडता आलेली नाही. सर्वच लोकप्रतिनिधीच्या प्रभावहिन नेतृत्वामुळे जिल्ह्याची घडी विस्कटली आहे. विशेष म्हणजे आमदार जयंत पाटील, खासदार संजय पाटील यांच्याकडून जिल्ह्याला असंख्य अपेक्षा होत्या. मात्र, ती फोल ठरली आहे.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा जिल्हा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्यामुळे गेल्या दहा-पंचरा वर्षात चांगले प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याला मिळालेच नाहीत. दिलीप सावंतांसारखा रस्त्यांवर उतरून स्मार्ट पोलिसिंग राबविणारा अधिकारी जिल्ह्यात नाही.  त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघू लागले आहेत. शहरामध्ये गजबजलेल्या ठिकाणी दरोडे पडू लागले आहेत. चोऱ्या, मारामाऱ्या, घरफोड्या आणि खुनांची मालिकाच सुरु झाली आहे. अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे. एकाही लोकप्रतिनिधीला याचे सोयरसूतक राहिलेले नाही. स्टंटबाजी आणि निवेदनाचे कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे एकेकाळी राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या द्रष्टा असलेला जिल्हा पिछाडीवर गेला आहे.

संपादक, सांगली टाइम्स.

Tags: