yuva MAharashtra छताला तडे, निखळलेले वीज फिटींग, स्वच्छ्ता गृहाची दुरवस्था

छताला तडे, निखळलेले वीज फिटींग, स्वच्छ्ता गृहाची दुरवस्था

सांगली टाईम्स
By -

मनपा शाळा क्रमांक ३८चा उखडलेला स्लॅब.

मनपा शाळा नंबर ३८ ची इमारत धोकादायक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

सांगली / प्रतिनिधी

छताला तडे, निखळलेले वीज फिटींग, स्वच्छ्ता गृहाची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई अशी महापालिका शाळा क्रमांक ३८ च्या इमारतीची अवस्था झाली आहे. अशा स्थितीतच अनेक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ही निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने तातडीने शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केली आहे. 

सांगली वार्ड क्रं. १० मधील राजर्षी शाहू काॅलनी(नवीन वसाहत) मधील सांगली मिरजआणि कुपवाड शहर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळा नंबर.३८ च्या इमारतीची अवस्था बिकट झाली असुन इमारत धोकादायक स्थितीत असुन देखील याच इमारतीमध्ये विद्यार्थी ज्ञानार्जन घेत आहेत.  एके काळी प्रचंड विद्यार्थी संख्या असणा-या या शाळेची अवस्था दयनीय झाली असून दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत आहे. इमारतीच्या छताला तडे गेले असुन अनेक ठिकाणी छताचा गिलावा पडलेला आहे. 

सन २०२२-२३ मध्ये या शाळेच्या दुरुस्तीसह इतर आवश्यक कामासाठी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी प्रशासनास सादर केला होता पण अद्याप याची दखल शिक्षण मंडळ किंवा महानगरपालिका प्रशासनाने घेतलेली नाही. याबाबतीत नव्याने अंदाजपत्रक व आराखडा मंजूर करुन इमारतीची दुरुस्तीसह इतर आवश्यक कामे करावीत अशी मागणी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केली आहे.

लाईट फिटींग निखळलेले आहे.पिण्याच्या पाण्याची  टंचाई असुन स्वच्छता गृह मोडकळीस आलेली आहेत. वर्गामध्ये दगडी परश्या तसेच छत्ररंजी नसलेने विद्यार्थ्यांना सिमेंट कोब्यावर बसावे लागत आहे. झोपडपट्टी बहूल वस्त्यांमधील या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक मोल-मजूरी करणारे असुन प्राथमिक शाळांशिवाय इतर खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीत. अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक शिक्षणाबाबत सकारात्मक धोरण निश्चित केलेले आहे.पण अशा इमारती असतील तर पालक अशा शाळांमध्ये विद्यार्थी कसे पाठवती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


Tags: