yuva MAharashtra 'फिन्द्री' कादंबरीचा बडोदा विद्यापीठात डंका..!

'फिन्द्री' कादंबरीचा बडोदा विद्यापीठात डंका..!

सांगली टाईम्स
By -


 बी. ए. च्या अभ्यासक्रमात समावेश; डॉ. सुनिता बोर्डे - खडसे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

सांगली / प्रतिनिधी

येथील श्री गुजराती सेवा समाज संचलित श्रीमती सी. बी. शाह महिला महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख व लेखिका  डॉ. सुनीता बोर्डे- खडसे यांच्या बहुचर्चित  'फिन्द्री' या कादंबरीचा समावेश, गुजरात राज्यातील  'द महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा'  येथील बी. ए. भाग तीन या वर्गाच्या मराठी अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक मराठी साहित्यातील सामाजिक, सांस्कृतिक अनुबंध उलगडून दाखविण्याचा उद्देशाने या कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. 

मराठवाड्यातील एका मागासवर्गीय कुटुंबातील, प्रचंड गरिबी, व्यसनी पतीचा जाच आणि सामाजिक दबावाला न जुमानता आपल्या मुलीला शिक्षण मिळवून देणाऱ्या अशिक्षित आईच्या संघर्षाची यशोगाथा सांगणारी ही कादंबरी आहे.  भारतीय जातीव्यवस्था, स्त्रीदास्य, पुरुषसत्ता , लिंगभाव अशा विविध गोष्टींवर प्रकाश टाकणाऱ्या या कादंबरीला महाराष्ट्रभरातील अनेक मानसन्मान मिळालेले आहेत. यापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात देखील या कादंबरीचा समावेश करण्यात आलेला आहे. 

मुलगी नको म्हणून जन्मतःच तिला फेकून देणाऱ्या, तिने शिक्षण घेऊ नये म्हणून बारावीच्या परीक्षेच्या वेळी तिची वह्या पुस्तके विहिरीत फेकून देणाऱ्या वडीलांच्या छळाला तोंड देत शिक्षणासाठी हिंमतीने उभे राहणाऱ्या मायलेकीची अर्थात नकोशा मुलीची गोष्ट सांगणारी 'फिन्द्री' ही कादंबरी मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा देणारी आहे.  मराठवाडी बोलीभाषेत लिहिलेल्या या कादंबरीने मराठी बोलीभाषेचे सौंदर्य अधोरेखित केलेले आहे.  

डॉ. सुनीता बोर्डे - खडसे यांची  'नेटपर्णी' ही सद्यकाळातील इंटरनेट महाजालाच्या भीषण वास्तवावर प्रकाश टाकणारी कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. कादंबरी , कथा, कविता, अनुवाद तसेच इतिहास संशोधन अशा अनेकविध लेखन प्रकारातील पुस्तके लेखिकेने लिहिलेली आहेत. म हाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ मराठी अधिविभागाचे तसेच मराठी अभ्यास मंडळाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. संजयकुमार करंदीकर यांनी नुकतेच या कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश झाल्याचे घोषित करून लेखिकेचे अभिनंदन केले.

श्री गुजराती सेवा समाजाचे अध्यक्ष श्री. कांतिभाई वामजा, उपाध्यक्ष डॉ. महेश शहा, सचिव श्री. रमणीकभाई दावडा, खजिनदार श्री. अशोक व्होरा, सदस्य  श्री. दिपकभाई शाह, रीतेशभाई शेठ, अरुणभाई शेठ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. खिलारे, कार्यालयीन अधीक्षक श्री. व्ही.बी. देवके, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी यांनी या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Tags: