- सरकारकडून ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज
- कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८५००
- हंगामी बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २७ हजार
- बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३२५००
सांगली / प्रतिनिधी
अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत अखेर राज्य शासनाने नुकसान अनुदानापोटी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८५००, हंगामी बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २७ हजार व बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० रुपये नुकसानपोटी मिळणार आहेत. नुकसानीच्या प्रमाणात ही मदत तुटपुंजी असल्याचे बोलले जात आहे.
अतीवृष्टी, परिस्थितीने बाधित शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले होते. शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या पॅकेजी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १८५०० रुपयांची मदत मिळणार आहे. हंगामी बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २७ हजार रुपयांची मदत. तर बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३२५०० रुपयांची मदत. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचं नुकसान झालं आहे, त्यांच्यासाठी तीस हजार रुपयांची विशेष मदत. इन्फ्राक्ट्रक्चरसाठी दहा हजार कोटींची तरतूद.
पावसामुळे ज्यांची घर पूर्ण पणे उद्ध्वस्त झाली आहेत, पडली आहेत, अशा लोकांना पीएम आवास योजनेंतर्गत नवं घर, तसेच ज्यांच्या घराचं अंशत: नुकसान झालं आहे, त्यांना घर उभारणीसाठी मदत. ज्या शेतकऱ्यांची जनावर वाहून गेली आहेत, पावसामुळे जनवरांचा मृत्यू झाला आहे, त्यांना प्रति पशू ३७ हजारांची मदत. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे, त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एकूण साडेतीन लाखांच्या मदतीचा निर्णय, त्यापैकी ४७ हजार रुपये हे रोख मिळणार, तर बाकीचे मनरेगाच्या माध्यमातून मदत केली जाणार. ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे, त्यांना नुकसानभरपाईची घोषणा.
