yuva MAharashtra जमीनमोजणी तीस दिवसात होणार

जमीनमोजणी तीस दिवसात होणार

सांगली टाईम्स
By -


- महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश
- आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्याला यश

सांगली / प्रतिनिधी

गुंठेवारीतील प्लॉट मोजणी संदर्भातील  विलंबाचा अडथळा आता दूर होणार आहे. मोजणी प्रकरणांचा निपटारा ३० दिवसांच्या आत करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तशी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

महसूलमंत्री बावनकुळे आणि आमदार गाडगीळ यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयात दिनांक ३० जुलै रोजी व्यापक बैठक झाली होती.त्या बैठकीत गुंठेवारीतील भूखंड धारकांना प्लॉट मोजणी संदर्भातील होणाऱ्या  विलंबाबाबत चर्चा झाली होती. आमदार गाडगीळ यांनी प्लॉट मोजणीतील विलंब दूरकरावा अशी आग्रही मागणी केली होती. गुंठेवारीतील प्लॉट धारक आणि झोपडपट्टी वासियाना दिलासा द्यावा असेही त्यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने महसूलमंत्री बावनकुळे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. तीस दिवसांच्या आत प्लॉट,जमीन मोजणीची प्रकरणे मार्गी लावावीत असे आदेश त्यांनी दिले आहेत. तशी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

महसूलमंत्र्यांच्या या  निर्णयामुळे जमीन मोजणीची कोट्यवधी प्रकरणे मार्गी लागणार आहेत. यामध्ये पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया होणार आहे. तीस दिवसात मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येत आहे असे राज्य सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे. आमदार गाडगीळ यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गुंठेवारीतील प्लॉटधारक, झोपडपट्टी वासिय तसेच जमीन मोजणीसाठी वाट पाहणारे नागरिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Tags: