- आमदार जयंत पाटील
- पूरग्रस्तांना पूर्ण मदत शक्य असतानाही सरकारकडून चालढकल
सांगली। प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणूकीमध्ये शेतकर्यांना योग्य वेळी कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. अतिवृष्टी, पूरामुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराद्यष्ट्रातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता हीच वेळ आहे. सरकारने शेतकर्यांना तातडीने कर्जमुक्त करावे. पूरग्रस्त शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. आमदार पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
आमदार पाटील म्हणाले, अतिवृष्टी, पूराने बाधित झालेल्यांना मदत कशी करणार हे सरकारने जाहीर केलेले नाही. पूर ओसरल्यानंतर नेमकी परिस्थिती लक्षात येईल. तोपर्यंत सरकारने पूरग्रस्तांना तातडीने मदत करावी. सरकारला शक्य आहे, पण चालढकल सुरु आहे. शेतकर्यांना प्रती एकर 50 हजार रुपयांची मदत करावी अशी आमची मागणी आहे. त्यापैकी 25 हजार तातडीने द्यावेत. पंचनामे झालेल्या कुटूंबधारकांनाही तातडीची गरज आवश्यक आहे. सरकार प्राथमिक मदतीची घोषणा करेल अशी अपेक्षा होती, मात्र मुख्यमंत्रीच अजून माहिती संकलनाचे काम सुरु असल्याचे सांगत चार ते पाच दिवसांची मुदत देत आहेत. पूर ओसरल्यानंतर नेमके किती नुकसान झाले आहे, हे कळेलच. पण आता तातडीने मदतीची गरज आहे. राज्य साकारने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकर्यांसाठी तिजोरी रिकामी करावी.
राष्ट्रवादीच्या प्रमुख मागण्या- अतिवृष्टीमुळे नुकसान शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांना तातडीने मदत करावी.- रब्बी हंगामासाठी शेतकर्यांना खते, बि-बियाणे व अनुदान द्यावे- विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफ करावी.- सरसकट पंचनामे करुन व्यापार्यांनाही दिलासा द्यावा.- पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणूकीमध्ये शेतकर्यांना कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. योग्य वेळी निर्णय घेऊ असेही म्हणाले होेते. आता हीच वेळ आहे शेतकर्यांना कर्जमाफी करण्याचे असे सांगत आमदार पाटील म्हणाले, मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. लोकांचे संसार वाहून गेले आहेत. लोकांच्या भावना तीव्र आहेत. सरकारने लोकांच्या भावनांशी न खेळता तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा. दरम्यान पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावे होत आहेत. याकडे लक्ष वेधले असता आमदार पाटील म्हणाले, कोणी कोणता कार्यक्रम घ्यायचा. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दरम्यान जिल्हा बँकेतील कारभाराची चौकशी बाबत विचारले असता ते म्हणाले, मी जिल्हा बँकेचा संचालक नाही. यावेळी आमदार रोेहित पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, वैभव शिंदे, मनोज शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.
