◼️मंत्री चंद्रकांत पाटील
◼️कारखाना प्रश्नी मारुती चौकातून उघड आव्हान
सांगली / प्रतिनिधी
सर्वोदय सहकारी सारख कारखाना परत देण्यासाठी जयंतरावांना किती पैसे पाहिजेत, त्यांनी सांगावेत. मी त्यांना पैसे द्यायला तयार आहे, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मारुती चौकातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उघड आव्हान दिले. दरम्यान‘‘माणसाच्या आयुष्यात कधी काय होईल, माहिती नसतं. त्यातच मजा असते. पृथ्वीराजच्या बाबत देर है, लेकिन अंधेर नही. भारतीय जनता पार्टी त्याच्यासोबत आहे.’’अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली..
भाजपच्या अकरा वर्षांच्या सत्ता काळातील विविध विकास कामांच्या फलकांचे अनावरण आज मारुती चौकात श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. त्याआधी त्यांनी पृथ्वीराज पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांना अभिवादन केले. आप्पांच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जयंतरावांना सर्वोदय कारखाना प्रकरणी आव्हान दिले.
कार्यालयातील आठवणीचंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पवार यांना ‘आता कार्यालयाचं रुपडं बदला’, अशी गंमतीशीर सूचना केली. आप्पा याच ठिकाणी बसून चारवेळा आमदार झाले. इथं आलं की काम होतं, हे लोकांना माहिती होतं. आम्ही विद्यार्थी दशेत असताना आप्पा आणि रामचंद्र देशपांडे यांची भेट घेऊनच जायचो, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
ते म्हणाले, ‘‘हा खूप जुना तिढा आहे, जो आम्ही कायदेशीर मार्गाने सन २०१४ ते २०१९ भाजपच्या सत्ताकाळात सोडवत आणला होता. कारखाना सभासदांच्या ताब्यात आलाच होता, त्यावर्षी गाळप परवानाही देण्यात येणार होता, मात्र तोवर महापूर आला. पुढे काही काळात सत्ता बदलली. जयंतरावांनी सत्तेचा गैरफायदा घेत कागदपत्रांत पुन्हा फेरबदल केले. त्यानंतर कोरोना आला. आता आमची सत्ता आहे, योग्य आणि न्याय बाबी होतील. जयंतरावांना आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, त्यांनी सांगावे किती पैसे द्यायचे. मी ते द्यायला तयार आहे.’’
