◼️सुहास बुधवले
◼️नागरिकांनी बळी न पडण्याचे आवाहन
सांगली । प्रतिनिधी
विविध समाजमाध्यमामध्ये ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशी योजना सुरुअसल्याचे संदेश प्रसारित होत आहेत. या नावाने अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. सदर संदेश ही केवळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये व फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास बुधवले यांनी केले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांमध्ये, 1 मार्च 2020 नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यु झाला आहे व बालकांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत व त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असा मजकूर प्रसारित होत आहे. महिला व बाल विकास विभागाची 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून हा संदेश केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत दक्षता बाळगावी, अशा अफवा असलेल्या सोशल मिडीया च्या पोस्टवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
शासन निर्णय दि. 30 मे 2023 नुसार जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना कार्यान्वित असून या योजनेचा निकषानुसार पात्र होणार्या लाभार्थ्यांनी या योजनेच्या लाभासाठीचा अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबतची अधिक माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या अंतर्गत असलेल्या तालुका संरक्षण अधिकारी अथवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कै. दादू काका भिडे बालगृह/निरीक्षणगृह, पुष्पराज चौक, सांगली मिरज रोड, सांगली येथे अर्ज करावा. या योजनेसाठी दोन्ही पालक अथवा एक पालक मयत असलेली बालके, वय वर्ष 18 पेक्षा कमी असलेली बालके, सद्यस्थितीत शाळेत जात असलेली बालके असे निकष आहेत. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बुधवले यांनी केले आहे.
