◼️हमाल पंचायतीच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
सांगली / प्रतिनिधी
शासकीय धान्य गोदामातील हमाल गेल्या चार महिन्यापासून मजुरी मिळालेली नाही. हमालांचा उदरनिर्वाह अडचणीत आला असून 180 हमालांनी जिल्हा हमाल पंचायतच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले. थकित मजुरी तात्काळ देण्यासाठी जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
धान्य गोदामातील हमालांच्या मजुरीसह विविध प्रश्नांबाबतचे निवेदन जिल्हा हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, जिह्यात सांगली, मिरज, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस, तासगाव, कडेगाव, विटा(कार्वे), शिराळा, इस्लामपूर अशी 11 मुख्य अन्नधान्य गोदाम तसेच आष्टा, माहुली हे दोन उपगोदाम आहेत. या गोदाममध्ये माथाडी मंडळाचे नोंदणीकृत 180 हमाल काम करीत आहेत. या हमालांना डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 अखेर तीन महिन्याची तसेच व्दारवितरण व्यवस्थेतील चार महिन्याची हमाली मजुरी अद्याप मिळाली नाही.
अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या बैठकीत डिसेंबरचे वेतन जमा करत असल्याचे आश्वासन दिले, परंतु अद्याप मजुरी मिळाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच धान्य गोदामामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सार्वजनिक नागरी सुविधा, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. याशिवाय इतर मागण्या प्रलंबित आहेत. याविरोधात सर्व शासकीय धान्य गोदामातील सर्व हमालांनी सरकार व प्रशासनाविरोधात निदर्शने केली. या आंदोलनात शिवाजी सरगर, बाबासो गडदे, शिवाजी हजारे, रमेश येडवे, धोंडीबा अनुसे, शरद पावले, आबासो खरात, निलेश खताळ, शिवाजी खोत, मनोहर पाटील, प्रकाश गुजळे यांच्यासह हमाल सहभागी झाले.
