yuva MAharashtra आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी

आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी

सांगली टाईम्स
By -

 


◼️फिल्‍म सिटीत जागा देणार
◼️केंद्र सरकारकडून ४०० कोटी   
◼️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
◼️‘वेव्ह्ज २०२५’ शिखर परिषदेचे यजमानपद महाराष्ट्राला

नवी दिल्ली / प्रतिनिधी

देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर  इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल व यासाठी केंद्र शासन ४०० कोटी रूपयांची आर्थ‍िक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio-Visual & Entertainment summit-2025-‘वेव्ह्ज 2025) च्या पहिल्या सत्राचे आयोजन आज सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले. या सत्रात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. जागतिक स्तरावर होणा-या या पहिल्या परिषदेचे यजमान पद  महाराष्ट्र राज्याला मिळाले असून, राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. तसेच याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानले. राज्याच्या आर्थिक राजधानीत १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे ही भव्य परिषद संपन्न होणार आहे. आज झालेल्या शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राचे आयोजन  केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने  केले असून, या सत्रात विविध देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांनी सहभाग घेतला.

मुंबईत 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी'ची उभारणी

महाराष्ट्राच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक केंद्रामध्ये 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी' (IICT) ची स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी सवांद साधताना दिली. या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश असून याबाबत, केंद्र शासन 400 कोटी रुपयांची आर्थिक सहायता देणार असल्याची माहितीही त्यांनी  यावेळी दिली . हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण भारताच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरेल," मुंबईत उभारले जाणारे IICT केवळ एक शिक्षण संस्था नसून, हे संपूर्ण क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उद्योगाला नवीन दिशा देणारे केंद्र बनेल. " असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

या महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर आपले विचार मांडले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व महाराष्ट्र शासन दरम्यान ‘वेव्ह्ज 2025’  निमित्त सामंजस्य करार झाला. या सत्राचे प्रास्ताविक केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजु यांनी केले तर आभार केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी केले. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे,उद्योग विभागाचे प्रधान सचिव एल.अनबलागन  उपस्थित होते.   



Tags: