◼️आनंद लेंगरे
◼️मदनभाऊ युवा मंचचा आंदोलनाचा इशारा
सांगली / प्रतिनिधी
महापुरानंतर सांगली, मिरजेतील बाजारपेठ अजूनही सावरलेली नाही. पूरग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाने आधीच मदत देण्याची गरज असताना महापालिका व्यवसाय नोंदणी कराच्या माध्यमातून व्यापाऱ्यांवर आणखीन कर लादत आहे. हा अन्याय असून येत्या महासभेत हा कर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा मदनभाऊ युवा मंचच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
आनंद लेंगरे म्हणाले, महापालिका क्षेत्रातीलव्या पाऱ्यांना व्यवसाय नोंदणी व परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. यासाठी महापालिकेने शिबीर सुरु केले असून तेथे व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची नोंदणी व परवाना शुल्क जमा करून घेतले जात आहे. कमीत ५०० ते जास्तीत जास्त २८ हजार ५०० रूपयापर्यंत हे शुल्क आहे. ते दरवर्षी नूतनीकरणावेळी भरावे लागणार आहे. वास्तविक सांगली, मिरजेतील व्यापारी महापुराने उद्ध्वस्त झाला आहे.
व्यापाऱ्यांचे करोडे रुपयांचे नुकसान झाले आहे. महापुरातील नुकसानीने बाजारपेठ येत्या काही वर्षात सावरण्याची शक्यता नाही. यासाठी शासन, महापालिकेने मदत करणे आवश्यक आहे. मात्र ते न करता महापालिका व्यापाऱ्यांवर व्यवसाय परवान्याच्या नावाखाली नवीन कर लादत आहे. हा कर अन्यायी आहे. त्यामुळे याबाबत पालिका प्रशासनाने फेरविचार करावा, हा कर येत्या महासभेत रद्द करावा. याबाबतच निर्णय न झाल्यास मदनभाऊ युवा मंचच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लेंगरे यांनी दिला.
