![]() |
| राजू शेट्टी (माजी खासदार) |
माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका
सांगली / प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतीक्षेत्रासाठी निराशाजनक असून यामध्ये मोठ मोठ्या घोषणा व पोकळ वलग्णा केल्या आहेत. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे मात्र या कृषीप्रधान देशात कृषीक्षेत्राचे हब बनविण्याऐवजी पर्यावरणपूरक खेळण्यांचा हब बनविण्याची घोषणा जर हे सरकार करत असेल तर या केंद्र सरकारचा शेती क्षेत्राबाबतचा दृष्टीकोन यामधून स्पष्टपणे दिसून येतो, अशी खरमरीत टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
शेट्टी म्हणाले, वास्तविक पाहता आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्डची कर्जमर्यादा वाढविली. डाळींच्याबाबतीत देश आत्मनिर्भर करण्याची घोषणा केली. धनधान्य कृषी योजनेची घोषणा केली मात्र हे सर्व करत असताना सिंचन तसेच पायाभूत सुविधांचा कोणताच निर्णय यावेळी घेण्यात आलेला नाही. खते, बि-बियाणे , किटकनाशके, शेती औजारे यावरती ६ टक्यापासून ते ३० टक्यापर्यंत जीएसटी लावण्यात आलेली आहे, यामधून जीएसटी करामध्ये सवलत देवून शेती व्यवसायाला बुस्टर डोस देण्याची गरज होती.
एकीकडे वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, केंद्र सरकारचे आयात निर्यातीबाबतचे अस्थिर धोरण, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे देशभरातील शेतकरी पिचलेला आहे. डाळीबाबत आत्मनिर्भर होण्याच स्वप्न पाहणा-या देशात उद्योगपतींच्या फायद्यासाठी सर्वाधिक डाळ व तेलबिया आयात केल्या जातात.
आंतरराष्ट्रीय बाजारात शेतक-यांच्या शेतीमालाला चांगले भाव मिळतात तेंव्हा निर्यातबंदी लावली जाते. देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. आज शेती व वस्त्रोद्योग क्षेत्रात सर्वाधिक शाश्वत रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, मात्र याकडे केंद्र सरकारने पुर्णता: दुर्लक्ष करून देशभरातील शेतक-यांना या अर्थसंकल्पातून शाश्वत असे काहींच मिळाले नाही.

