yuva MAharashtra ठेकेदार व प्रशासनात 'लेटर वॉर'

ठेकेदार व प्रशासनात 'लेटर वॉर'

सांगली टाईम्स
By -

टक्केवारीचा विषय पेटला ; संघर्ष पेटणार 

सांगली / प्रतिनिधी 

विकासकामांची बिले काढण्यासाठी टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप करत काही ठेकेदारांनी महापालिकेत खळबळ उडवून दिली आहे. परिणामी ठेकेदार व प्रशासनामध्ये 'लेटर वॉर' सुरु झाले आहे. या आरोपांची गंभीर दखल घेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी संबंधित ठेकेदारानां पुरावे सादर करावेत असे पत्र धाडले आहे. तर ठेकेदारानीही या पत्राला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी सुरु केली असल्याने भविष्यात प्रशासन विरुद्ध ठेकेदार संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

महापालिकेवर सद्या प्रशासकीय राज आहे. गेल्या काही महिन्यात प्रशासनाच्या कारभारावर अनेकानी प्रश्नचिन्ह निर्माण केले. घरपट्टी वाढ, सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्या मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली.  भंगार विक्रीसह अनेक निविदा मॅनेजचे आरोप झाले. पण प्रशासनाने वेळोवेळी हात झटकले. लोकप्रतिनिधी म्हणून मिरविणाऱ्यांनी महापालिकेत आढावा बैठका घेतल्या पण आरोप झाल्या विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. 

त्यामुळे प्रशासकीय कारभाराचा 'वारू ' सुसाट सुटला आहे. दरम्यान गत महिन्यापासून बिले काढण्यावरून ठेकेदार व प्रशासनामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. बिले काढण्यासाठी टक्केवारी ची मागणी केली जात असल्याचा आरोप काही ठेकेदारांनी थेट आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासमोर केला. आयुक्त गुप्ता यांनी याची गंभीर दखल घेत लेखी पत्र द्या अशी सूचना केली. ठेकेदारांनी तसे लेखी पत्र आयुक्त गुप्ता यांना दिले. 

या आरोपामुळे महापालिकेत चांगलीच खळबळ माजली. महापालिका क्षेत्रात याची खुमासदार चर्चा सुरु झाली. टक्केवारीचा विषय पुन्हा चव्हाट्यावार आला. ठेकेदारांच्या या आरोपानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. आरोप करणाऱ्या ठेकेदारांना प्रशासनाने पुरावे सादर करण्याची नोटीस पाठवली आहे.  ठेकेदारानीही 'अभी नही, तो कभी नही ' असा नारा देत प्रशासनाच्या नोटीसीला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासन विरुद्ध ठेकेदार असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. 


Tags: