yuva MAharashtra जिल्हा परिषद अध्यक्ष ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

जिल्हा परिषद अध्यक्ष ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

सांगली टाईम्स
By -


हर्षवर्धन सपकाळ संघर्षमय राजकीय प्रवास

सांगली / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्रात खांदेपालट केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर करत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हापरिषदेचे अध्यक्ष ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सपकाळ यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मरगळलेल्या काँग्रेसला उभारी देण्याचे मोठे आव्हान नूतन प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासमोर आहे.

उत्तम संघटन कौशल्य आणि काँग्रेस पक्षावरील अढळ निष्ठा ही सपकाळ यांची जमेची बाजू आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास कौतुकास्पद आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी, त्यांच्या कष्टाला आणि निष्ठेचा योग्य सन्मान हा काँग्रेस पक्षच करू शकतो असे म्हटले जाते. ते सपकाळ यांच्या निवडीने अधोरेखीत झाले आहे. त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले.‘आदिवासी जिवनोत्थान’सारख्या उपक्रमाद्वारे शेवटच्या घटकासाठी लढण्याची भूमिका, कार्यकर्त्यांशी जोडले जाण्याची आणि जनतेशी संवाद साधण्याची त्यांची तळमळ पक्षासाठी महत्वपुर्ण ठरली आहे. 


Tags: