माजी नगरसेविका आरती वळवडे यांचा आरोप; निविदा मॅनेज; अन्यथा न्यायालयात जाणार
सांगली / प्रतिनिधी
महानगरपालिकेतील ४ विभागातील भंगार साहित्याच्या जाहिर झालेली लिलावाची निविदा प्रक्रिया चुकिच्या पध्दतीने राबविली आहे. ही निविदा मॅनेज करण्यात आली असून महापालिकेचे तब्बल साडे तीन कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रियाच रद्द करावी अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आरती वळवडे यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या अग्निशमन, ड्रेनेज, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व विद्युत विभाग येथे बरेच भंगार साहित्य विविध ठिकाणी पडुन आहे. या भंगार विक्रिसाठी एका खाजगी एजन्सी मार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे व त्यांनी या भंगाराचे मुल्यांकन सब्बा कोटी रूपये केल्याचे समजते. मुळात अशी विक्रि प्रक्रिया करणे हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधिल मालमत्तेचा विनीयोग क्रं. ७९ महानगरपालिकेच्या मालमत्तेचा विनियोग करण्यासंबंधीच्या तरतुदीनुसार पुर्नतः चुकिचे आहे.
नियमानुसार जाहिर लिलावाची रितसर कार्यपध्दती राबविणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या सर्व विभागाने जे भंगार साहित्य पडुन आहे त्याची तपशिलवार माहिती यांत्रिकी विभागाला कळविणे गरजेचे आहे. त्यानंतर यांत्रिकी अभियंता यांनी ती सर्व तपशिलवार माहिती प्रशासकिय स्थायी समिती व महासभा यांची मंजुरी घेऊन मनपाच्या संकेतस्थळावर व सर्व वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करून त्याची जाहिर लिलाव विक्रि करणे गरजेचे होते.
जाहिर लिलाव प्रक्रिया केली तर मनपास भंगार विक्रिमधुन उत्पन्न जवळपास रूपये ४ ते ५ कोटी मिळेल. परंतु आता खाजगी कंपनीने सर्व भंगार साहित्याचे मुल्यांकन सव्वा कोटी रूपये केले आहे. यामध्ये मनपाचे जवळपास रूपये ३ ते ३.५० कोटीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे भंगार विक्रिची प्रक्रिया रद्द करून नविन प्रक्रिया महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधिल मालमत्तेचा विनीयोग क्रं. ७९ महानगरपालिकेच्या मालमत्तेचा विनियोग करण्यासंबंधी तरतुदीनुसार जाहिर लिलाव प्रक्रिया करणेत यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
