माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे यांचे प्रयत्न यशस्वी; प्रत्यक्ष कामास सुरवात ; २० लाखांचा निधी मंजूर
सांगली / प्रतिनिधी
येथील राम मंदिर चौकामध्ये भव्य असा १०० फुटी भगवा ध्वज उभा करण्यात येणार आहे. याशिवाय या चौकाचे सुशोभीकरणही होणार आहे. यासाठी भाजपाच्या माजी नगरसेविका ऍड. स्वातीताई शिंदे यांच्या प्रयत्नातून २० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. शनिवारी या कामास सुरवात झाली. माजी आमदार तथा हिंदू एकता आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी या कामाची पाहणी केली.
सांगलीतील श्री राम मंदीर चौकाची एक वेगळी ओळख आहे. श्री राम मंदिर या चौकाध्ये आहे. काही महिन्यांपूर्वी याच चौकातून हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी भाजपाच्या माजी नगरसेविका तथा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे यांनी या चौकामध्ये भव्य असा १०० फुटी भगवा ध्वज उभा करू अशी घोषणा केली होती. यासाठी त्यांचा महापालिकेसह संबंधित यंत्रणा कडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. जवळपास २० लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झाला आहे. यामध्ये ध्वज आणि चौक सुशोभीकरण असा समावेश आहे.
माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, ऍड. स्वाती शिंदे यांनी प्रभाग क्रमांक १६ मध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. भगवा ध्वज आणि चौक सुशोभीकरणासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यास यश आले. आता कामास सुरवात झाली आहे. लवकरच भगव्या ध्वजाचे थाटामाटात उद्घाटन करू.
दरम्यान अयोध्या येथे प्रभा श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा झाला त्यादिवशी या कामाचे सांगलीत भूमिपूजन करण्यात आले होते. आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आणि जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यावेळी उपस्थित होते. दरम्यान शनिवारी या कामास प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली. माजी आमदार नितीन शिंदे यांनी कामाची पाहणी केली. काम दर्जेदार करण्याच्या सूचना मक्तेदारास दिल्या. यावेळी संजय जाधव, अनिरुद्ध कुंभार, राजू गस्ते, अर्जुन मजले, अमित शिंदे उपस्थित होते.
