![]() |
| सांगली पोलीस मुख्यालय आवारात बॉम्ब शोधताना बॉम्ब शोधक पथकातील कर्मचारी. |
दारूच्या नशेत डायल ११२ वर फोन ; एकास अटक
सांगली / प्रतिनिधी
'डायल ११२' या क्रमांकावर फोन करत पोलीस मुख्यालयात बॉम्ब लावल्याची माहिती देत एकाने खळबळ उडवून दिली. पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली. अवघ्या काही मिनिटात बॉम्ब शोधक पथकास पाचारण करण्यात आले. मुख्यालयासह महत्वाच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. तब्बल दोन अडीच तास ही शोध मोहिम सुरू होती. अखेर हा खोटा कॉल असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान पोलिसांनी खोटा फोन करणाऱ्या यमनाप्पा मरगप्पा माडर (वय ५०, रा. मालगाव ता. मिरज) याला अटक केली आहे. त्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याची कबुलीही दिली आहे.
शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास डायल ११२ वर कॉल आल्यानंतर फोन करणाऱ्याने ‘सांगली पोलिस कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला, पोलिस मदत हवी आहे’ अशी अर्धवट माहिती देत फोन कट केला. हा कॉल शहर पोलिस ठाण्याकडे डायल ११२ वर कार्यरत पोलिस कर्मचारी वसिम मुलाणी यांना ट्रान्सफर झाला. त्यांनी गांभीर्य ओळखून वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तत्काळ आदेश दिले. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्ष, अधीक्षक कार्यालय, बसस्थानक येथे बॉम्बशोधक पथकाला पाठवून तपासणी करण्यात आली. परंतू तेथे कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही.
त्यामुळे खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे खोटा कॉल करणाऱ्याचा शोध सुरू केला. सहायक निरीक्षक नितीन सावंत व पथकाने हा कॉल मालगाव (ता. मिरज) येथून आल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर कॉल करणाऱ्या माडर याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने दारूच्या नशेत कॉल केल्याचे कबुल केले. दरम्यान माडरच्या या खोट्या फोन मुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाली.

