![]() |
| ना. जयकुमार गोरे (ग्रामीणविकास मंत्री) |
सांगलीशी जिव्हाळ्याचे संबंध ; सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी सख्य
सांगली / प्रतिनिधी
राज्याचे ग्रामीणविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत आहेत. आठवडाभरात यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान गोरे यांचे सांगलीतील सर्वच नेत्यांशी घनिष्ठ राजकीय संबंध आहेत. त्यामुळे सांगलीचे पालकमंत्री तेच होतील अशी चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात भाजपचे चार आणि शिवसेनेचा एक असे पाच आमदार सत्ताधारी गटाचे आहेत.
विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्याने महायुतीच्या पाठीमागे मोठी ताकद उभा केली. भाजपचे चार तर शिवसेना (शिंदे गट) एक असे पाच आमदार निवडून दिले. जत मधून गोपीचंद पडळकर, मिरज मधून डॉ. सुरेश खाडे, सांगलीतून सुधीर गाडगीळ तर शिराळा विधानसभा मतदार संघातून सत्यजित देशमुख असे भाजपचे चार आमदार निवडून आले. याशिवाय खानापूर - आटपाडी या मतदार संघातून शिवसेना (शिंदे गट) सुहास बाबर यांनी मोठा विजय मिळवला.
जिल्ह्यात मोठे यश मिळाल्याने मंत्री पदी किमान डॉ. खाडे किंवा. टीम देवेंद्र मधील गोपीचंद पडळकर यांची वर्णी लागेल अशी आशा होती. मात्र ती फोल ठरली. जिल्ह्याला मंत्रिपदापासून डावलण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याला उपरा पालकमंत्री मिळणार हे स्पष्ट झाले. दरम्यान राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे हेच सांगलीचे पालकमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. गोरे यांचे सांगलीशी असलेले जिव्हाळ्याचे सबंध, सर्व पक्षीय राजकीय नेत्यांशी असलेले सख्य पाहता त्यांच्याच खांद्यावर सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान मंत्री झाल्यानंतर गोरे यांनी सांगलीचा धावता दौरा करत सर्वच नेत्यांची भेट घेतली होती.
